रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या   

मॉस्को : पश्चिम रशियात शनिवारी रात्री स्फोटामुळे दोन पूल कोसळ्याने रेल्वे गाड्या रूळावरून घसरल्या. ब्रांस्क प्रांतात स्फोटामुळे एक पूल कोसळल्याने प्रवाशांनी भरलेली रेल्वे रुळावरून घसरली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेच्या काही तासांनंतर युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या कुर्स्क प्रदेशात आणखी एक पूल कोसळल्याने दुसरी रेल्वे रुळावरून घसरली.
 
मॉस्को रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, एक रेल्वे रशियातील पश्चिमेकडे असणार्‍या क्लिमोव येथे मार्गस्थ झाली होती. ब्रांस्क प्रांतातील विगोनिचस्की जिल्ह्यातून जात असताना एका पुलाखाली स्फोट घडवण्यात आला. त्यामुळे भरधाव रेल्वे रुळावरून घसरली आणि पुलाच्या ढिगार्‍याला धडकली. या भीषण दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रेल्वेच्या मोटरमनचाही समावेश आहे. ३० हून अधिक प्रवासी जखमी आहे. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
दुसर्‍या घटनेत इंधन वाहून नेणारी रशियन लष्कराची मालवाहू रेल्वे क्रिमियाला जात असताना ती स्फोटात उडवण्यात आली. ब्रांस्कचे राज्यपाल अलेक्झेंडर बोगोमाज यांनीही या रेल्वे दुर्घटनांच्या वृत्ताला दुजोरा दिला असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे म्हटले आहे. 
 
दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉस्कोने केलेल्या आक्रमणापासून रशियाचे सैन्य पूर्व युक्रेनमधील झापोरिझ्झिया प्रदेशात घुसखोरी करत आहे. त्यांनी २०१४ मध्ये क्रिमिया ताब्यात घेतला होता.

रेल्वे अपघातामागे युक्रेनचा हात?

रशिया आणि युक्रेनमधील तीन वर्षांच्या युद्धादरम्यान हा अपघात घडला. रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनकडून सीमेवरील रशियन प्रदेशांमध्ये गुप्त छापे, गोळीबार आणि ड्रोन हल्ले अजूनही सुरू आहेत. त्यामुळे हा हल्ला युक्रेनने केल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत आहे.

इस्तंबूलमध्ये लवकरच दोन्ही देशांमध्ये चर्चा 

रशियाने इस्तंबूलमध्ये युक्रेनियन अधिकार्‍यांसोबत दुसर्‍या फेरीच्या चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. युक्रेनने अद्याप आपल्या सहभागाची पुष्टी केलेली नाही. ते प्रथम रशियाच्या प्रस्तावांचा आढावा घेतील. त्यानंतर पुढील निर्णय जाहीर करतील.
 

Related Articles